त्या '५००' किलो वजनाच्या महिलेसाठी मुंबईत दोन कोटींचं हॉस्पिटल

Header Banner

त्या '५००' किलो वजनाच्या महिलेसाठी मुंबईत दोन कोटींचं हॉस्पिटल

  Thu Jan 12, 2017 16:27        Marathi

जगातील सर्वोत लठ्ठ महिला असणा-या इमान अहमद यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सैफी रुग्णालयाकडून विशेष 'वन बेड हॉस्पिटल' बांधण्याची तयारी सुरु झाली आहे. या विशेष रुग्णालयासाठी तब्बल दोन कोटींचा खर्च केला जाणार आहे. एका मोठ्या रुग्णालयात मिळणा-या सर्व सुविधा या रुग्णालयात उपलब्ध असणार आहेत. इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर लवकरच मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे.  

तीन हजार फूट परिसरात हे हॉस्पिटल उभं राहणार आहे. यामध्ये एक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, डॉक्टरांसाठी खोली,  दोन विश्रांतीगृह आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रुम असणार आहे. इमान अहमद यांचं वजन लक्षात घेता त्याआधारे सर्व वस्तूंची उपलब्धता आणि जागेचं बांधकाम करण्यात आलं आहे. यामध्ये 7 फूट रुंद दरवाजे बांधण्यात आले असून, बेडदेखील 7 फूट रुंद असणार आहे. 

मुंबईतील प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला ही शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यांच्यासोबत विशेष टीम उपस्थित राहणार असून ऑपरेशन झाल्यानंतरदेखील 24 तासांसाठी त्यांना देखरेखेखाली ठेवण्यात येणार आहे. 

स्ट्रोकमुळे इमानचा उजवा हात आणि पायाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. तिला बोलता येत नाही, तिला टाईप-2 डायबेटिस आहे. शिवाय तिला उच्चरक्तदाबाचा त्रास असून, फुप्फुसांचाही त्रास आहे. इमान यांनी ट्विटरच्या माध्यमातून डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्याकडे मदत मागितली होती. यानंतर लकडावाला यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागत मदतीसाठी ऑनलाइन मोहिमदेखील चालवली होती.

इजिप्तमध्ये राहणाऱ्या इमानचे वजन ५०० किलो असल्याने ती जगातील सर्वाधिक वजन असलेली महिला आहे. केवळ ३६ वर्षांची असलेल्या इमानला प्रचंड वजनामुळे घराबाहेर पडता आलेले नाही. वयाच्या पंचविशीपासून ती घरातच आहे. तिला साधे अंथरुणावरून हलताही येत नाही. अवाढव्य आकारामुळे दैनंदिन हालचाली करणेही तिला कठीण होते. इमान दैनंदिन व्यवहारासाठी पूर्णपणे आईसह बहिणीवर अवलंबून राहते. जन्मावेळी तिचे वजन ५ किलो होते.   500 kg woman,hospital in Mumbai,two crores